सिध्दार्थ उद्यानातच सचिनला अखेरचा निरोप

Foto

औरंगाबाद- महानगरपालिकेच्या सिध्दार्थ उद्यानाची शान असलेला व गेल्या सहा महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देत असलेला पांढरा वाघ सचिनची काल शनिवारी दि.५ सायंकाळी प्राणज्योत मालवली. सिध्दार्थ उद्यानातच जन्माला आलेल्या ‘सचिन’वर सिध्दार्थ उद्यानातच अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सिद्धार्थ उद्यानातील  प्राणिसंग्रहालयाचे  नेहमीच आकर्षण ठरलेला सचिन हा सुमारे पंधरा वर्षीय पांढरा वाघ गेल्या सहा महिन्यांपासून  मृत्यूशी झुंज देत होता काही दिवसांपूर्वी त्याच्या प्रकृतीत सुधारणाही दिसून आली होती.  पण त्यानंतर  गेला महिनाभर  सचिन अन्नपाणी घेत नव्हता.  तो केवळ सलाईनवर  होता. शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास सचिनचे मृत्यूशी सुरू असलेली झुंज आखिर थांबली.

१९९५ मध्ये महापालिकेने प्रमोद व भांनुप्रिया ही पांढऱ्या वाघाची जोडी आणली होती. त्यांच्या पोटी श्याम व सीता यांचा जन्म झाला होता तर त्यांच्या पोटी १८ जानेवारी २००४ साली सिद्धार्थ उद्यानातच सचिनचा जन्म झाला होता. तेव्हापासून त्याने सिद्धार्थ उद्यानातील पर्यटकांचे चांगले मनोरंजन केले होते. बच्चे कंपनीलाही सचिनचे देखणे रूप चांगलेच भावले होते. म्हणून दर रविवारी किवा सुट्टीच्या दिवशी सचिनला बघायला पर्यटकांची चांगलीच गर्दी होत होत असे.

त्याने अखेरचा श्वास देखील सिध्दार्थ उद्यानातच घेतला.  यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अलविदा सचिन अशा शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अंत्यसंस्कारावेळी महापौर नंदकुमार घोडेले उपायुक्त वसंत निकम, पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर बाबुळगावकर, फॉरेस्ट अधिकारी, उद्यान अधीक्षक व प्राणिसंग्रहालयाचे संचालक विजय पाटील, सुपरवायझर संजय नंदन आदींची उपस्थिती होती.